मुंबई / ऑनलाईन टीम
मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता, असे सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
रुपाली चाकणकर यांनी यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्य़ांनी म्हटले आहे की, सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. दीपाली यांची वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.