नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांनी राज्यतील वातावरण ढवळून निघाले आहे. आरोपाची मालिका सुरू असतानच आता नवीन वाद निर्माण झाला आहे. खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. सावंत यांच्याकडून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता नवनीत राणा यांनी सावंत यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे .
खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्याविरुद्ध धमकावल्या प्रकरणी तक्रार दाखल करणार आहे. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती.
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केलेली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण व मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. ‘तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं असल्याचे नवनीत राणा यांचे म्हणणे आहे.
खासदार सावंत यांनी नवनीत राणा खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी एक शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का? उलट नवनीत राणा सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर पाहिले तर जेव्हा केव्हा त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात.