नियमांच्या चौकटीतच उत्सव, गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ कराड
कोरोनच्या संकटाने यंदा सर्वच सण, उत्सवांवर मर्यादा आणल्या आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. यासंदर्भात लवकरच राज्य सरकारकडून नियमावली जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. कराडसह जिह्यात प्रशासनाने नियमावलींच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा दांडियाच्या आनंदाला मात्र मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
कोरोना रुग्णांचे आकडे कमी जास्त होत असल्याने अजूनही हे संकट प्रत्येकाच्या अवतीभोवती फिरत आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटाने गणेशोत्सव, ईद यासह सर्वच सणांवर मर्यादा आणल्या. कराड तालुक्यात 167 गावांत सार्वजनिक गणेशोत्सव रद्द झाला, तर अनेक गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवला. आता 16 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. कराड तालुक्यासह जिह्यात नवरात्र उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. कराड तालुक्यात 434 सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे आहेत. नवरात्र उत्सव म्हटले, की दांडियाचा उत्साह सर्वत्र असतो. सर्वच मंडळे, विविध ग्रुप, राजकीय पक्ष, संघटनांकडून दांडियाचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे दांडियाला मनाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. दांडिया खेळताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अशक्य आहे. त्यामुळे कराड शहरात दरवर्षी ज्या ग्रुपकडून रासदांडियाचा कार्यक्रम केला जातो, त्यांनी यंदा कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत.
शिवाय नवरात्र उत्सवातही गर्दी टाळण्यासाठी मिरवणुकांवर बंधने येण्याची शक्यता आहे. दुर्गादेवीच्या आरतींसाठी महिला मोठय़ा गर्दीने येत असतात. यंदा एकत्र येऊन आरती करता येणार नाही, असेही संकेत आहेत. 16 ऑक्टोबरपासून उत्सवाला सुरुवात होत असून शासनाने लवकर यासंदर्भातील नियमावली जाहीर करावी, अशी मागणीही होत आहे. जेणेकरून सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना त्यांचे नियोजन नियमाप्रमाणे करता येईल. गणेशोत्सवातील नियमांचा अंदाज लक्षात ठेवून बरीच मंडळे सार्वजनिक उत्सव साध्यापणाने साजरा करण्याच्या तयारीत आहेत.
शासनाच्या नियमांचे पालन करावे
जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या, कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. नवरात्र उत्सवाबाबत शासनाचे जे निर्देश असतील, त्या निर्देशांचे पालन सार्वजनिक उत्सव मंडळांनी करावे. कोरोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवातही सार्वजनिक मंडळांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे.