घरांसह मंदिरांत घटस्थापना, पहिल्याच माळेला तुळजा भवानी जाणार अंबाबाईच्या भेटीला, रात्री अंबाबाईचा पहिला पालखी सोहळा
प्रतिनिधी/कोल्हापूर
देवदेवतांची आराधना, आरती सोहळे, दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना, उपवास यासह विविध धार्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलमध्ये गुरुवारपासून (दि. 7) शारदीय नवरात्रोत्सावाला प्रारंभ होत आहे. करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजा भवानी, आझाद चौकातील दत्तभिक्षालिंग, टेंबलाई, जोतिबा आणि नृसिंहवाडीतील दत्तात्रयांसह जिह्यातील मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाईल. सकाळी साडेआठ वाजता अंबाबाई मंदिरात परंपरेनुसार तोफेची सलामी देऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाल्याचे संकेत मिळतील.
दुपारी दोनच्या सुमारास अंबाबाईची ब्रह्माणी रुपात पूजा बांधण्यात येईल. याचवेळी घरोघरी देवदेवतांची पूजाअर्चा करुन घटस्थापना करण्यासाठी धांदलही उडेल. परंपरेनुसार अनेक मंडळांनी अंबाबाई मंदिर व तुळजा भवानी मंदिर परिसरात दुर्गाज्योत प्रज्वलित करुन आपापल्या गावीने नेल्या. नवरात्रौत्सवाच्या पुर्वसंध्येला सेवेची जबाबदारी मिळालेले पूजारी चेतन चौधरी यांनी अंबाबाईची पंखापूजा बांधली. सकाळी अंबाबाई मंदिरात घटस्थापना झाल्यानंतर दहाच्या सुमारास तुळजा भवानी मंदिरात घटस्थापना होऊन परंपरेनुसार बकऱयाचा बळी देण्याचा विधी होईल. चांदीच्या पालखीतून तुळजा भवानी अंबाबाईच्या भेटीसाठी बाहेर पडेल. तसेच रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईचा पहिला पालखी सोहळा होईल. उत्सवकाळात रोज रात्री होणाऱया पालखी सोहळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अंबाबाईच्या सेवेत असलेले आणि मानकरीच सहभागी असतील.
नवरात्रौत्सव काळातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या विविध रुपात बांधण्यात येणाऱया पूजा अशा ः
तारिख पूजेचे नाव
7 ऑक्टोबर ब्रह्माणी
8 ऑक्टोबर माहेश्वरी
9 ऑक्टोबर कौमारी
10 ऑक्टेबर (ललिता पंचमी) गजारुढ अंबारी
11 ऑक्टोबर वैष्णवी
12 ऑक्टोबर इंद्राणी
13 ऑक्टोबर (जागर) महिषासुरमर्दिनी
14 ऑक्टोबर (खंडेनवमी) चामुंडा
15 ऑक्टोबर (विजया दशमी) रथात विराजमान