सणासुदीच्या काळात लांब पल्ल्यासाठी सोडणार 50 बसेस : आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनला मागील दोन वर्षांत प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सणासुदीच्या व सुटीच्या काळात फेऱया वाढवून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बेळगाव बसस्थानकातून नवरात्रोत्सव काळात विविध मार्गांवर जादा 50 वातानुकूलित आराम बस धावणार आहेत. सणासुदीच्या काळात मुंबई, पुणे, बेंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणांहून येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने विविध मार्गांवर विशेष बस पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
बसस्थानकातून लांब पल्ल्यासाठी बेंगळूर, चेन्नई, तिरुपती, म्हैसूर, नाशिक, ठाणे, हैदराबाद, बळ्ळारी, बिदर आदी ठिकाणी विशेष बस धावणार आहेत. बेळगाव-चेन्नई ही दुपारी धावणारी बस वगळता इतर सर्व आराम बस रात्रीच्या प्रवासासाठी धावणार आहेत.
जिल्हय़ातील अनेकजण कामानिमित्त मुंबई, गोवा, पुणे, बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर आदी ठिकाणी आहेत. दसऱयाच्या सुटीनिमित्त बरेचजण गावाकडे परतत असतात. त्यामुळे सुटीच्या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली असते. त्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विविध शहरांकडे आराम बस धावणार आहेत. त्यामुळे वातानुकूलित आराम बसना प्रवाशांचा प्रतिसाददेखील वाढत आहे.
केएसआरटीसी मोबाईल ऍपच्या माध्यमातून बुकिंग व्यवस्था
परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर केएसआरटीसी मोबाईल ऍप विकसित केले आहे. हे ऍप प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करून प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकतात. प्रवाशांना बसस्थानकात येण्याची गरज नसून घरबसल्या मोबाईलवरून ऍपच्या माध्यमातून वातानुकूलित बसचे बुकिंग करता येते. शिवाय परिवहनच्या www.ksrtc.in या वेबसाईटवर बुकिंग सुरू आहे. तसेच बसस्थानकातदेखील आगाऊ बुकिंगची व्यवस्था करण्यात आली
आहे.
आराम बसना प्रतिसाद – नितीन गडदे (डेपो मॅनेंजर)
वातानुकूलित आराम बसना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात विविध ठिकाणी 50 हून अधिक वातानुकूलित बस धावणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विविध शहरांकडे बस सोडल्या जाणार आहेत.
बसस्थानकातून धावणाऱया वातानुकूलित आराम बस
बस | वेळ |
बेळगाव-चेन्नई (बेंगळूर) | दुपारी 12 वा. |
बेळगाव-तिरुपती (बेंगळूर) | रात्री 8.30 वा. |
बेळगाव-म्हैसूर | रात्री 8 वा. आणि 8.50 वा. |
बेळगाव-नाशिक | सायंकाळी 5.30 वा. |
बेळगाव-ठाणे | रात्री 9.30 वा. |
बेळगाव-हैदराबाद | रात्री 7.30 व रात्री 8.50 वा. |
बेळगाव-बळ्ळारी | रात्री 10 वा. |
बेळगाव-बिदर | रात्री 9 वा. |
बेळगाव-बेंगळूर | रात्री 8 वा. आणि 8.50 वा. |