अनेक मंडळांचे कार्यक्रम रद्दः गुजराती बांधवही साध्या पद्धतीने करणार उत्सव
प्रशांत वाडेकर : देवगड:
गणेशोत्सवानंतर खऱयाअर्थाने वेध लागतात, ते नवरात्रोत्सवाचे! पण, यावर्षी कोरोनासारख्या महामारीचे संकट अर्धे वर्ष उलटले तरी कायम आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय असल्याने सर्वधर्मियांच्या सण, उत्सवांवर बंधने आली आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवही साधेपणात साजरा करण्यात आला. आता नवरात्रोत्सवदेखील साधेपणातच साजरा करण्याचा निर्णय बहुतांशी नवरात्रोत्सव मंडळांनी घेतला आहे. नवरात्रोत्सव हा तरुणाईचा उत्साह व चैतन्याचा उत्सव आहे. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे यावर्षी दांडिया, गरबा नृत्यावर थिरकणाऱया पावलांना ‘ब्रेक’ बसणार आहे.
मुंबई, पुणे, गुजरातसारख्या मोठय़ा शहरांप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हय़ातही सर्व तालुक्यांमध्ये दरवर्षी नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळांमार्फत केली जाते. आता अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. मात्र, कोरोनाचे सावट तरुणाईच्या उत्साहाच्या आड येत आहे. शासनाने गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही साधेपणात करण्याच सूचना दिल्या आहेत. उत्सवासाठी लाऊड- स्पीकर, डी. जे. साऊंड सिस्टीमला परवानगी दिलेली नाही. उत्सव करण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांवर बंधने घातली आहेत. नवरात्रोत्सवात सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याने अनेक मंडळांनीच यावर्षी उत्सव साधेपणात करायचा ठरविले आहे. अनेक स्पर्धा, महाप्रसादासारखे कार्यक्रम रद्द केले आहेत. काही मंडळांनी सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजराती बांधवांचा उत्सवही साधेपणात
देवगड तालुक्यातील गुजराती बांधवांचा नवरात्रोत्सव मोठा असतो. मात्र, यावर्षी हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय गुजराती बांधवांनी घेतला आहे. येथील ज्येष्ठ गुजराती बांधव कांतीलाल पटेल म्हणाले, तालुक्यात व्यवसायानिमित्त असलेले गुजराती बांधव नवरात्रोत्सवासाठी देवगडमध्ये एकत्र येतात. येथे परंपरेप्रमाणे आम्ही उत्सव साजरा करतो. स्थानिक ग्रामस्थही उत्सवात सहभागी होतात. मात्र, यावर्षी आम्ही आपापल्या घरीच उत्सव साधेपणात साजरा करण्याचे ठरविले आहे. शासनाने उत्सव साजरा करण्यास काही सवलती दिल्या, तर एकत्रितपणे व सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.
‘कोरोना’ संकटासाठी देवीचरणी घालणार साकडे
कातवण येथील तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळाचा नवरात्रोत्सवही यंदा साधेपणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी केवळ दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा व आरती केली जाणार आहे. सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी देवीला साकडे घातले जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जोईल यांनी सांगितले.
विजयदुर्गमध्ये मंदिराच्या गाभाऱयात होणार उत्सव
विजयदुर्ग येथील श्री राधाकृष्ण विश्वस्त समितीचा नवरात्रोत्सवही यंदा साध्या पद्धतीने होणार आहे. दरवर्षी पाच फूटाची असणारी दुर्गामातेची मूर्ती यावर्षी तीन फूटाची करण्यात आली आहे. यंदाचा उत्सव खुल्या मैदानात न करता मंदिराच्या गाभाऱयात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केला जाणार आहे. बाहेरील व्यक्तींना उत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे होणारा अन्नदानाचा कार्यक्रम होणार नाही, अशी माहिती मंडळाचे सदस्य महेश बिडये यांनी दिली.
‘इंद्रधनू’चा दांडिया उत्सव रद्द
देवगड येथील इंद्रधनू प्रेंड्स क्लबचा दरवर्षी होणारा दांडिया उत्सव यावर्षी साजरा होणार नाही. कोरोना संक्रमणामुळे यावर्षी शासनाने घातलेल्या बंधनांमुळे उत्सव साजरा करणे व आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने दांडिया उत्सव साजरा होणार नाही. मात्र, त्यानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार केला जाईल, असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.