वृत्तसंस्था/ जमशेदपूर
रविवारी येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या दुसऱया कनिष्ठ पुरूषांच्या अकादमी राष्ट्रीय 2022 च्या हॉकी स्पर्धेत यजमान नवल टाटा हॉकी अकादमीने अजिंक्यपद पटकाविले.
या स्पर्धेतील झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात नवल टाटा अकादमी जमशेदपूर हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये सेल हॉकीअकादमीचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करत अजिंक्यपद मिळविले. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे गोल बरोबरीत होते. सामन्यातील 13 व्या मिनिटाला सेल हॉकी अकादमीचे खाते नीतेशने उघडले. 27 व्या मिनिटाला मोहम्मद दानीशने नवल टाटा हॉकी अकादमीला बरोबरी साधून दिली. 44 व्या मिनिटाला कर्णधार के लाक्राने पेनल्टी कॉर्नरवर नवल टाटा हॉकी अकादमीचा दुसरा गोल केला. 58 व्या मिनिटाला दीपक सोरेंगने सेल अकादमीचा दुसरा गोल नोंदविला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये नवल टाटा हॉकी अकादमीच्या प्रदीप, शिवम सिंग, सिमॉन बोद्रा आणि सुकांत गुरिया यांनी गोल नोंदविले पण सेल हॉकी अकादमीतर्फे टी. यादवने एकमेव गोल नोंदविल्याने त्यांना या स्पर्धेत उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत राऊंड ग्लास पंजाब हॉकी क्लब अकादमीने तिसरे स्थान मिळविताना आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.