प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व परिसरात नववर्षाचे स्वागत केले जात असताना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहर अंधारात गेले. मुख्य वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल एक तास वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करणाऱया नागरिकांचा हिरमोड झाला.
गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहर व उपनगरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला. शहराला वीजपुरवठा करणाऱया मुख्य वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा ठप्प झाला होता. हेस्कॉम व केपीटीसीएलचे कर्मचारी व अधिकारी बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत होते. झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी बराच कालावधी लागला.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण सेलिब्रेशनचा आनंद घेत होता. परंतु अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. घरात शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा बेत असलेल्यांना वीजपुरवठा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत गृहिणींना वाट पाहावी लागली. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला.