नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारीला शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 10 वा हप्ता हस्तांतरित करतील, असे मोदी सरकारने सोमवारी जाहीर केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांना आपल्या बँकखात्याचे ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. यासाठी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नोंद करताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.