मुंबई/प्रतिनिधी
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना अटक केलं. त्यांनतर त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना सेशन कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. ईडीने कोठडी घेण्यापूर्वी मलिकांची वैद्यकीय चाचणी केली होती.
यानंतर त्यांना पुन्हा जे.जे. रुग्णालयात चाचणीसाठी आणण्यात आलं. यावेळी मलिकांची प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळत आहे. मलिक यांना पोटाचा त्रास सुरू झाल्याने चाचणीसाठी वेळ लागला. मलिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना तासाभरात पुन्हा ईडीच्या कोठडीत नेणं अपेक्षित होतं. मात्र, चार तास झाल्यानंतरही त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू आहेत. रुग्णालयात त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू असून उपचारही पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.