ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध असल्याच्या कारणावरुन ईडीने अटक केलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर मलिक यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. पोटदुखीमुळे मलिक यांची प्रकृती खालावली असून, त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. परंतु, नवाब मलिक यांना नेमका कसला त्रास होत आहे, हे समजू शकले नाही.
दाऊदशी संबंधित सात ठिकाणची संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने मलिक यांना अटक केली आहे. 3 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.