ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दिली माहिती : अध्ययन सुरूच
पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत नव्या संकरावतारामुळे रुग्ण अधिक आजारी पडत नसल्याचे ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी अध्ययनानंतर सांगितले आहे. परंतु बी.1.1.7 स्ट्रेनचे संक्रमण वेगाने फैलावते. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी अध्ययनासाठी 1769 जुन्या स्वरुपाच्या रुग्णांची तुलना 1769 नव्या स्वरुपाच्या रुग्णांशी केली आहे.
अध्ययनात नव्या संकरावतारामुळे मृत्यूदर वाढत नसल्याचे आणि रुग्ण पूर्वीच्या तुलनेत अधिक आजारी पडत नसल्याचे दिसून आले आहे. परंतु वैज्ञानिक अद्याप यासंबंधी स्वतःचे संशोध सुरू ठेवणार आहेत, अशी माहिती पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार सुसन हॉपकिन्स यांनी दिली आहे.
ब्रिटनमध्ये नव्या संकरावताराचे रुग्ण वाढल्याने लाखो लोकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. विविध देशांनी ब्रिटनसाठीची विमानसेवा रोखली आहे. याचमुळे हा देश जगात आता एकाकी पडला आहे. नव्या संकरावताराच्या संपर्कात येणारे 15 टक्के लोक बाधित आढळले आहेत. तर अन्य संकरावताराच्या संपर्कात आल्याने 10 टक्के बाधित झाल्याचे एका विश्लेषणातून वैज्ञानिकांना समजले आहे. कोरोनाच्या नव्या संकरावताराने संक्रमित 35 टक्के लोकांच्या नमुन्यांमध्ये विषाणूचे प्रमाण खूपच अधिक होते, तर अन्य संकरावताराने संक्रमित केवळ 10 टक्के लोकांच्या नमुन्यांमध्ये विषाणूचे प्रमाण अधिक होते. यातून अधिक व्हायरल लोडमुळे बी.1.1.7 संकरावतार अधिक फैलावत असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. यासंबंधी पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि बर्मिंगहॅम विद्यापीठाने एक अध्ययन केले होते.