आयपीओसह अन्य मार्गांच्या मदतीने उभारणार भांडवल : एलआयसीची भागीदारी राहणार मजबूत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत शेअर बाजारात लिस्ट होणाऱया नवीन कंपन्या अंदाजे 22 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य जोडण्याची शक्यता आहे. यामध्ये एकटी एलआयसी कंपनी 10 लाख कोटी रुपये जोडण्याचा अंदाज आहे. यासह भारतीय भांडवली बाजारात एकूण कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचण्याचे संकेत आहेत.
बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 240.86 लाख कोटी रुपये आहे, तसेच येणाऱया 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत ज्या कंपन्या आयपीओ आणणार आहेत, त्यांचे बाजारमूल्य जवळपास 12 लाख कोटी रुपयांच्या घरात जाणार असल्याचे भाकीत क्रेडिट सुइस यांच्या अंदाजानुसार व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय आयपीओ बाजार मजबूत
सध्याच्या कालावधीत भारतीय आयपीओचा बाजार खूप मजबूत होत आहे. यामध्ये ज्या नवीन कंपन्या लिस्ट झाल्या आहेत, त्यांनी 3.60 लाख कोटींचे बाजारमूल्य जोडले आहे. सदरच्या यादीत झोमॅटोचे बाजारमूल्य 1 लाख कोटी रु. आहे. प्राप्त अहवालानुसार आयपीओच्या व्यतिरिक्त अन्य मार्गाने निधी उभारण्याची गती थोडी कमी राहिली आहे. रिटेल व म्युच्युअल फंडामधून पैसा तेजीने येत आहे.
चालू वर्षात 38 आयपीओ
चालू वर्षांमध्ये एकूण 38 आयपीओ भारतीय भांडवली बाजारात आले आहेत. यातील 34 लिस्टिंग झाले आहेत तर येणाऱया काळात बाजारात आणखी चार कंपन्यांचे आयपीओ सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीओंना वाढता प्रतिसाद ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत 8 कंपन्यांचे आयपीओ भारतीय भांडवली बाजारामध्ये सादर करण्यात आले आहेत. एप्रिल ते जुलै या काळामध्ये एकंदर बाराहून अधिक आयपीओ भारतीय भांडवली बाजारात उतरवण्यात आले आहेत. या अंतर्गत कंपन्यांनी 27 हजार कोटी रुपये उभारले असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही कालावधीत कोल इंडिया, जनरल इन्शुरन्स, हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमीटेड यासारख्या कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. पण दुसरीकडे उत्तम परतावा देणाऱया कंपन्यांची संख्या जास्त दिसून आली आहे. यामध्ये एसबीआय कार्ड, झोमॅटो, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, पॉवरग्रीड इनवीट, ग्लँडफार्मा, आयसीआयसीआय प्रुडन्शीयल, आयसीआयसीआय लोंबार्ड, एंबसी ऑफिस यासारख्या आयपीओनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.