कोरोना संकटामुळे कामाची गती मंदावली
प्रतिनिधी / पणजी
नवीन झुआरी पुलावरील एक रस्ता डिसेंबर 2021 पर्यंत खुला करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, मे 2021 पर्यंत त्या पुलावरील एकतरी रस्ता वाहनांसाठी खुला करण्याचे नियोजन होते, परंतु कोरोना संकटामुळे काम वेगाने होऊ शकले नाही, आणि ते साध्य झाले नाही. तथापि हे ध्येय डिसेंबर 2021 पर्यत साध्य करण्याचे लक्ष्य आता ठेवण्यात आले आहे.
महामंडळातर्फे चालू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. ती कामे पूर्ण करण्यावर भर देण्याची सूचना संचालक मंडळाला करण्यात आली आहे. आरोग्य तसेच शैक्षणिक साधनसुविधा तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले. अनेक सरकारी शाळांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम म्हणून सरकारला मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. तिसऱया मांडवी पुलाचे उर्वरीत काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.