5 हजार 995 लाभार्थ्यांना रेशनकार्डे वितरित : गोरगरीब जनतेला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या नवीन बीपीएलकार्डच्या कामाला प्रारंभ झाला आहे. जिल्हय़ातील 5 हजार 995 लाभार्थ्यांना नवीन बीपीएल रेशनकार्डचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत अंत्योदय, एपीएल, बीपीएल रेशनकार्डची पूर्तता केली जाते. मात्र कोरोना आणि इतर कारणांमुळे नवीन अंत्योदय व बीपीएलकार्डची कामे थांबली होती. दरम्यान अनेक लाभार्थ्यांना कार्डअभावी रेशनपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता नवीन रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ झाल्याने अनेकांना रेशनचा लाभ घेता येणार आहे.
शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास रेशनकार्ड, आधारकार्ड महत्त्वाची आहेत. मात्र अनेकांकडे रेशनकार्ड नसल्याने शासकीय योजनांपासूनदेखील वंचित रहावे लागले होते. अखेर खात्याने नवीन कार्डच्या कामाला प्रारंभ केल्याने अनेकांची शासकीय कामेदेखील मार्गी लागली आहेत. नवीन अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डसाठी लाभार्थ्यांनी 2 वर्षांपासून ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. मात्र शासनाने नवीन कार्डांची कामे हाती घेतली नव्हती. त्यामुळे दाखल झालेले अर्जदेखील पडून होते. मात्र मागील पंधरा दिवसांपासून नवीन बीपीएलकार्डच्या कामाला प्रारंभ झाला असून अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून रेशनकार्डे वितरित केली जात आहेत.
जिल्हय़ात तालुकानिहाय वितरित करण्यात आलेली रेशनकार्डे
तालुके | अर्ज दाखल लाभार्थ्यांची संख्या | अर्ज रद्द लाभार्थ्यांची संख्या | रेशनकार्ड वितरित संख्या | अर्ज प्रलंबित लाभार्थ्यांची संख्या |
अथणी | 4532 | 13 | 45 | 4487 |
बैलहोंगल | 2013 | 259 | 339 | 1674 |
बेळगाव | 9455 | 168 | 2023 | 7432 |
चिकोडी | 3248 | 276 | 406 | 2842 |
गोकाक | 5096 | 749 | 748 | 4348 |
हुक्केरी | 3201 | 151 | 818 | 2383 |
खानापूर | 2051 | 7 | 50 | 2001 |
रायबाग | 4098 | 51 | 152 | 3946 |
रामदुर्ग | 2305 | 20 | 93 | 2212 |
सौंदत्ती | 3154 | 459 | 679 | 2475 |
कागवाड | 1518 | 1 | 6 | 1512 |
कित्तूर | 797 | 48 | 75 | 722 |
मुडलगी | 1932 | 141 | 323 | 1609 |
निपाणी | 1826 | 131 | 238 | 1588 |
एकूण | 45226 | 2470 | 5995 | 39231 |