वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय रेल्वे दरदिनी एक नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतीय रेल्वेने नव्या डिझाइनच्या विस्टाडम टूरिस्ट कोचची 180 किलोमीटर प्रतितासाच्या वेगासह चाचणी पूर्ण केली आहे. रेल्वेचा हा डबा प्रवाशांना संस्मरणीय अनुभव देणार असून पर्यटनाला चालना देण्याचे काम करणार असल्याचे उद्गार रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी काढले आहेत.
भारतीय रेल्वेच्या चेन्नई येथील कोच फॅक्ट्री लवकरच विस्टाडम टूरिस्ट कोचला लवकरच रुळावर आणण्याची योजना आखत आहे. हे डबे जोडली जाणारी रेल्वे प्रामुख्याने पर्यटनासाठी असणार असून ती पर्यटनस्थळांनाच भेट देणार आहे. या डब्याची रेल्वे दादर, मडगाव, अराकू खोरे, काश्मीर खोरे, दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे, कांगडा खोरे रेल्वे, माथेरान हिल रेल्वे, नीलगिरी माउंटेन रेल्वेत धावणार आहे.
विशेष सुविधा
या डब्यांमध्ये मोठय़ा काचेच्या खिडक्या असून छतही काचेचे आहे. यात ऑब्जर्वेशन लाउंज असून फिरती आसने आहेत. या सर्वांच्या मदतीने पर्यटन बाहेरील दृश्य पाहू शकतील. पर्यटनस्थळावरून जात असताना काचेचे छत आणि खिडक्यांमधून सहजपणे बाहेर पाहता येणार असून छायाचित्रेही काढता येतील. तर फिरत्या आसनांमुळे बसूनच सर्वबाजूचे दृश्य नजरेत साठवता येणार आहे.
वाय-फाय आधारित यंत्रणा
हे सर्व डबे तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत आधुनिक आहेत. यात वाय-फाय आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमही आहे. या डब्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात काचेचा वापर करण्यात आला आहे.