प्रतिनिधी/ वास्को
नवेवाडे वास्को येथील एका समाजसेवकाच्या दोन दुचाक्यांना आग लावण्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडवण्यात आल्याचा संशय असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नवेवाडे येथील सांतान कुरेय्या यांनी आपल्या दोन दुचाक्या शेजारच्या एका बंद घराजवळ रोजच्या प्रमाणे पार्क केल्या होत्या. या दोन्ही दुचाक्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत या दोन्ही दुचाक्या पूर्णपणे जळून गेल्या. या घटनेमुळे त्या घराचेही नुकसान झाले. पहाटेच्या वेळी ही आग लावण्यात आल्याने आग लावणारे कोण याचा पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळताच अग्नीशामन दलाने घटना स्थळी धाव घेतली. मात्र, तोपूर्वीच दुचाक्या खाक झाल्या होत्या. या प्रकरणी सांतान कुरेय्या यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. जाळपोळीचा हा प्रकार पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचा संशय आहे. वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.