ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्वच विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने गठीत केलेल्या समितीने नव्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू करण्याची शिफारस केली आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नव्या शैक्षणिक सत्रासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने हरियाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर.सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
या समितीने विद्यापीठ आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार, पदवीच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करावेत. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून प्रथमवर्षाचे वर्ग सुरू करावेत. त्याची परीक्षा 1 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत घेण्यात यावी. तर अंतिम परीक्षा 1 ते 31 जुलै 2021 या कालावधीत घेण्यात यावी. तसेच दुसऱ्या वर्षापासून पुढील इयत्तांचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होईल. यामुळे यापुढे सप्टेंबर ते जुलै असे शैक्षणिक वर्ष राहील, अशी शिफारस या समितीने केली आहे.
महाविद्यालयांच्या राहिलेल्या परीक्षा 1 ते 31 जुलै या कालावधीत आयोजित कराव्यात. अंतर्गत मूल्यमापनांसाठी आवश्यक प्रकल्प 16 ते 30 मे या कालावधीत पूर्ण करावेत. विद्यापीठांनी परीक्षा घेताना 70 : 30 हे सूत्र वापरावे. जून महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी, अशीही शिफारस या समितीने केली आहे.