प्रतिनिधी / सांगली
शनिवारी जिल्हय़ात कोरोनाचे नवे सात रूग्ण वाढले. तर सहा जण कोरोनामुक्त झाले. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या २८६ आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने उपचारातील रूग्णसंख्या १०५ झाली आहे.
सात रूग्ण वाढले
जिल्हय़ातील शिराळा तालुक्यातील मणदूर हे गाव कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. याठिकाणी शनिवारी दहा वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. तर कडेगाव तालुक्यातील रायगाव येथे मुंबईहून आलेला ५५ वर्षीय पोलीस अधिकारी याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. तर मिरज तालुक्यातील बामणोली येथील ३३ वर्षाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बामणोली येथे नवीन कंटेन्मेंट झोन सुरू करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील दोन महिला, तर तासगाव तालुक्यातील वायफळे येथील युवक, कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील एक युवक पॉझिटिव्ह आढळला. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सहा जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शनिवारी सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील ३४ वर्षीय व्यक्ती, ठाणापुडे येथील २९ वर्षीय व्यक्ती, तासगाव तालुक्यातील शिरगाव येथील ६२ वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील १८ वर्षीय युवक, तर किनरेवाडी येथील ३५ वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील विहापूर येथील ८२ वर्षीय व्यक्ती या सर्वांच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले असता ते निगेटीव्ह आले आहेत. हे सर्व जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आता संस्था क्वारंटाईन केले जाणार आहे.
अतिदक्षता विभागात सात जणांवर उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती, कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील अंकले येथील ६६ वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील रिळे येथील ७० वर्षीय व्यक्ती आणि मालगाव येथील ७२ वर्षीय महिला या सात जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण २८६
बरे झालेले १७२
उपचारात १०५
मयत ०९