स्वच्छ हवेकरता ब्रिटनने उचलले महत्त्वाचे पाऊल, दरवर्षी 1.45 लाख पॉइंटची पडत जाणार भर
हवामान बदल रोखण्यासाठी ब्रिटनने मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटनमध्ये आता निर्माण होणाऱया प्रत्येक नव्या इमारतीत इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग पॉइंट तयार करणे अनिवार्य असेल. सुपर मार्केट, कार्यालयीन जागा आणि इमारत नुतनीकरणावेळी इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंट तयार करून घेणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 1.45 लाख नवे चार्जिंग पॉइंट तयार केले जातील. तसेच देशात 2030 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या कार्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. ब्रिटनच्या या निर्णयाला इलेक्ट्रिक कार क्रांतिच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जातेय.
1,500 कोटींची योजना
सरकारने याकरता 1500 कोटी रुपयांची एक योजना तयार केली आहे. यांतर्गत छोटय़ा उद्योजकांना पर्यावरण अनुकूल नवोन्मेष तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. हवामान बदलावर प्रभावी आळा घालण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर भर देण्यात येतोय. कोरोना काळानंतर कार्यालयांमध्ये परतणाऱया लोकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक परिवहनाच्या सुविधांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये सर्वाधिक
ब्रिटनमध्ये युरोपमधील सर्वाधिक सुमारे 2.5 लाख इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंट आहेत. पण देशात इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीच्या तुलनेत हा आकडा कमी ठरू लागलाय. ईव्ही ड्रायव्हर ऍप जॅप-मॅपनुसार ब्रिटनमध्ये सद्यकाळात सुमारे 26 हजार चार्जिंग पॉइंटमध्ये बिघाड झाला आहे. तसेच सुमारे 10 टक्के चार्जिंग पॉइंट्सचा दीर्घ अंतरापर्यंतच्या कार चार्जिंगसाठी वापरले जाऊ शकत नाही. चार्जिंग पॉइंट प्रकरणी लवकर तोडगा काढला जावा असे जॅप-मॅपचे संस्थापक मेलाइन शफलबॉथम यांनी म्हटले आहे.