मुंबई / वृत्तसंस्था
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच सोमवारी शेअरबाजार उघडताच सेन्सेक्स 1,400 अंकानी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक म्हणजेच निफ्टी 400 अंकानी घसरला आहे. 4 मे 2020 नंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. शेअर बाजारात झालेल्या या पडझडीने काही क्षणातच गुंतवणूकदारांना जवळपास 7 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलमध्ये 6.59 लाख कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल 185 लाख कोटी रुपये इतके होते. आज शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे ते आता 178.79 लाख कोटी रुपयांवर आले आहे.
भारतातील शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असतानाच ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा नवा कोरोना व्हायरस 70 टक्के अधिक संसर्ग वाढवू शकणारा असल्यामुळे भारतासह अनेक देशानी ब्रिटनबरोबरची विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी कोसळले. याचा परिणाम जागतिक व्यापारावर आणि उद्योगधंद्यावर होईल, असे गुंतवणूकदारांना वाटल्यामुळे सोमवारी मोठी पडझड दिसून आली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,406.73 अंकांनी म्हणजेच 3 टक्क्यांनी कोसळून 45,553.96 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 432.15 अंकांनी म्हणचेच 3.14 टक्क्यांनी कोसळून 13,328.40 अंकांवर बंद झाला.
रुपयाचीही 23 पैशांनी घसरण
नव्या कोरोना स्ट्रेनमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक मोठय़ा प्रमाणात कोसळल्यानंतर त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही झाला. रुपया 21 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 73.79 रुपये प्रतिडॉलर या पातळीवर गेला. जागतिक परिस्थिती खराब झाल्यामुळे चलन व्यापारी डॉलरची खरेदी करीत असल्याचे दिसून आले.