ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांना दीर्घकाळापासून तिच्या मोठय़ा पडद्यावरील पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. चाहत्यांना सुखावणारी घोषणा ऐश्वर्याने केली आहे. मणिरत्नम यांच्या ‘पीएस-1’ म्हणजेच पोन्नियिन सेल्वम चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ऐश्वर्याने चित्रपटाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मणिरत्नम यांच्या पीएस-1 सोबतस सुवर्णकाळ जिवंत होत असल्याचे तिने म्हटले आहे. पीएस-1 हा ऐतिहासिक कालखंडावर आधारित चित्रपट असून तो तमिळ भाषेत तयार केला जात आहे. मणिरत्नम यांच्या या चित्रपटाची निर्मिती मद्रास टॉकीजकडून होत आहे. तमिळमधील दिग्गज अभिनेते विक्रम मुख्य भूमिकेत आहेत. विक्रम आणि ऐश्वर्या यांनी यापूर्वी मणिरत्नम यांच्या ‘रावण’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
ऐश्वर्या राय बच्चन यापूर्वी 2018 मध्ये प्रदर्शित फन्ने खान चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात अनिल कपूर आणि राजकुमार राव यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर पीएस-1 चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. म्हणजेच ऐश्वर्या चार वर्षांनी चित्रपटातून दिसून येणार आहे.