कापडी मास्कचेही दर उतरणार
वार्ताहर / सावंतवाडी:
कोरानाच्या प्रारंभीच्या काळात एन-95 मास्कची किंमत अडीचशे रुपयांपासून 500 पर्यंत गेली होती. तसेच एन-95 मास्क मिळणे कठीण झाले होते. आता शासन निर्णयानुसार एन-95 मास्कसाठी 19 रुपये आकारता येणार आहेत. मात्र, सध्या काही मोजक्याच दुकानांमध्ये हे मास्क उपलब्ध आहेत. जिल्हय़ात जादा दरामुळे एन-95 मास्क वापरणाऱयांची संख्याही कमी आहे. त्याऐवजी कापडी मास्कचा वापर केला जात आहे. बहुतेक मेडिकल स्टोअर्समध्ये एन-95 मास्क पडून होते. त्यात आता दरही कमी करण्यात आल्याने मेडिकल स्टोअरधारकांची कुचंबणा झाली आहे. दर कमी केल्याने या मास्कचा वापर वाढेल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. मात्र, दर कमी होऊन आठ दिवस उलटले तरी मास्क खरेदीचे प्रमाण कमी आहे. सावंतवाडीत मेडिकल स्टोअर्समध्ये अद्यापही नवीन दराचे मास्क उपलब्ध नाहीत. काही मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. परंतु त्यांना मागणीच नाही. नागरिकांना कापडी मास्क वापरण्याची सवय लागून गेल्याने किंमत कमी झाली असली तरी एन-95 मास्क वापरण्याकडे कल फारच कमी आहे. कापडी मास्कच्या दरापेक्षा आता एन-95 मास्क स्वस्त मिळू लागल्याने दुकानदारांनी कापडी मास्कची किंमत कमी केली आहे.