ऑनलाईन टीम / नेपाळ :
भारत आणि नेपाळमध्ये लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी या तीन भागांच्या सीमेवरून वाद आहेत. काही दिवसांपूर्वीच हे तिन्ही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवले होते. या नवीन नकाशाला मान्यता देण्यासाठी नेपाळ सरकारने प्रस्तावित केलेल्या घटनादुरुस्तीला नेपाळी संसदेने एकमताने मंजुरी दिली आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यात 1800 किमी लांबीची सीमा आहे. मात्र, यातल्या काही भागात नद्या असल्याने या सीमा निश्चित झाल्या नाहीत. भारताने कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग सुकर व्हावा यासाठी यंदा लिपुलेखपासून 5 किमी लांबीचा रस्ता बांधला. त्यानंतर दोन्ही देशात सीमेवरून वाद सुरू झाले.
सीमावाद सुरू झाल्यावर नेपाळने लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी हे तिन्ही भाग नेपाळच्या हद्दीत दाखवले. त्यानंतर राजकीय नकाशा सादर केला. आता या नकाशाच्या मंजुरीसाठी नेपाळच्या के. पी. शर्मा ओली सरकारने घटनादुरुस्तीचा प्रस्ताव नेपाळी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सादर केला. त्याला संपूर्ण सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. या नव्या घटनादुरुस्तीनंतर नेपाळला नवीन राष्ट्रीय चिन्ह मिळणार आहे.