माजी मुख्य़मंत्री दिगंबर कामत यांचे प्रतिपादन : मायकल लोबो, अमित पाटकर यांनी स्वीकारला पदभार
प्रतिनिधी /पणजी
कोणत्याही निवडणुकीत जय- पराजय हा अटळ असतो, असे सांगून मायकल लोबो आणि अमित पाटकर या नव्या दमाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष गोव्यात पुन्हा एकदा गरुड झेप घेईल अशी आशा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी वर्तवली आहे. काँग्रेसचे 6 उमेदवार अवघ्या मतांनी हरले त्या मतांची बेरीज 3000 च्या आसपास होते म्हणजेच तेवढी मते निर्णायक ठरली असे अनुमान काँग्रेसचे निरीक्षक पी. चिंदबरम यांनी काढले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्याकडे पदाची सुत्रे देण्याचा पदभार सोहळा पणजीत झाला. यावेळी कामत व चिंदबरम बोलत होते. काँग्रेस पक्षाचे आमदार प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
ग्रीन एकर्स- सांतइंनेज पणजी येथे सदर सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तर कामत यांनी अनुक्रमे अध्यक्षपद, विरोधी पक्षनेते पद त्यांना प्रदान केले. त्यावेळी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
नवे अध्यक्ष पाटकर म्हणाले की आपला 100 टक्के वेळ पक्षबांधणी यासाठी देणार असून काँग्रेसच्या 11 आमदारांचे शॅडो मंत्रिमंडळ तयार करणार आहे. पक्षाच्या विविध समित्यांमध्ये तरुणांना अधिक वाव देणार असून वेगवेगळे 6 विभाग तयार करुन सरकारचा गैरकारभार जनतेसमोर उघडा करणार असल्याचा इरादा पाटकर यांनी प्रकट केला.