महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातमध्ये रुग्णसंख्येत वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्ग वाढत असून रविवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात 16 हजार 752 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 86.37 टक्के रुग्ण या सहा राज्यात आहेत. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांचे प्रमाण कमी असल्याने सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 64 हजार 511 वर पोहोचली आहे. भारतात सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.48 टक्के इतके आहे.
देशात मागील 24 तासात 16 हजार 752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 8 हजार 623 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये 3 हजार 792 आणि पंजाबमध्ये 593 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात शनिवारी दिवसभरात 113 मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंतच्या एकूण मृतांचा आकडा 1 लाख 57 हजार 51 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 11 हजार 718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत बरे होणाऱयांचा आकडा 1 कोटी 7 लाख 75 हजार 169 वर पोहोचला आहे.
केंद्रीय सचिव पातळीवर आढावा बैठक
सक्रिय रुग्णसंख्या आणि नवीन कोविड बाधित रुग्णांमध्ये सतत वाढ होत असलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत केंद्र सरकार निरंतर संपर्क साधत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीर या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण
देशात आतापर्यंत अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, लडाख, चंदीगड, नागालँड, पंजाब आणि पुदुच्चेरी या राज्यांनी नोंदणी झालेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱयांपैकी 60 टक्क्यांपेक्षा कमी जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे. लडाख, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, त्रिपुरा, मध्यप्रदेश, गुजरात, लक्षद्वीप, राजस्थान, केरळ आणि दादरा आणि नगर हवेली या 12 राज्यांनी आघाडीवर काम करणाऱया एकूण कर्मचाऱयांपैकी 65 टक्क्यांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण केले आहे.