पंतप्रधान मोदींने केले कौतुक : राज्याला 3 प्रकल्पांची भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमध्ये एलपीजी पाईपलाईन प्रकल्पाच्या एक ब्लॉक आणि दोन बॉटलिंग प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. याचबरोबर मोदींनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समर्थन दर्शविले आहे. नवा भारत आणि नव्या बिहारचे लक्ष्य पूर्ण करण्यात नितीश कमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मोदी म्हणाले.
मागील अनेक वर्षांपासून बिहार विकासाप्रकरणी मागे पडला होता, यामागे राजकारणासह काही अन्य कारणे होती. एकेकाळी बिहारमध्ये उत्तम रस्त्यांचे जाळे आणि इंटरनेट कनेक्टिविटीवर चर्चा होत नव्हती. बिहारने अनेक समस्या झेलल्या आहेत. परंतु बिहारला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. बिहारमध्ये सुशासन निश्चित करावे लागणार आहे. मागील 15 वर्षांमध्ये करण्यात आलेली चांगली कामे सुरू रहावीत असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
एक पिढी काम सुरू होताना आणि दुसरी पिढी ते पूर्ण होताना पाहण्याचा काळ आता संपला आहे. नवा भारत आणि नव्या बिहारची कार्यसंस्कृती, ओळख आम्हाला अधिक बळकट करायची असल्याचे मोदी म्हणाले. पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईनचा दुर्गापूर-बांका क्षेत्र तसेच बांका आणि चंपारण्य जिल्हय़ातील दोन एलपीजी बॉटलिंग प्रकल्पांचे मोदींनी रविवारी उद्घाटन केले आहे.
गॅस पाईपलाईन प्रकल्पामुळे बिहारमध्ये खते, ऊर्जा आणि इस्पात क्षेत्राच्या उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच सीएनजी आधारित स्वच्छ वाहतूक प्रणालीचाही लाभ होणार आहे. याचबरोबर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.