मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी केली चर्चा, उत्सुकता शिगेला
प्रतिनिधी /बेंगळूर
ज्येष्ठ भाजप नेते येडियुराप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्माई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल, याविषयी आठवडाभरापासून उलटसुलट चर्चा रंगली होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपुष्टात येणार असून मंगळवारी सायंकाळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा नव्या मंत्र्यांच्या नावांची घोषणा करणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी रात्री 10.15 वाजता पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी बसवराज बोम्माई यांनी सोमवारी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष आणि केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन चर्चा केली. बोम्माई यांनी रात्री नड्डा यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण संभाव्य मंत्र्यांच्या दोन-तीन याद्या दिल्या आहेत. त्यापैकी किती जणांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदे द्यावी, याची घोषणा जे. पी. नड्डा मंगळवारी करतील. उपमुख्यमंत्रिपद कोणाकोणाला द्यावे, याविषयीही हायकमांडच निर्णय घेणार आहे. नूतन मंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही मंगळवारीच समजेल, असे ते म्हणाले.
मागील शुक्रवारी बसवराज बोम्माई नवी दिल्लीला गेले होते. मात्र, त्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे रविवारी रात्री ते पुन्हा दिल्लीला गेले. सोमवारी सकाळी 11 वाजता भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार होते. मात्र, ही भेट लांबणीवर पडली. त्यामुळे त्यांनी रात्री नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊनच बोम्माई हायकमांडच्या भेटीला गेले. त्यांनी बी. एल. संतोष आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा केली. यावेळी कोणाकोणाला मंत्रिपदे द्यावीत, याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
10-12 जागा रिक्त राहणार?
एकाच वेळी पूर्ण प्रमाणात मंत्रिमंडळ विस्तार केल्यास पक्षांतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याने पहिल्या टप्प्यात 20 ते 22 जणांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 10 ते 12 जागा रिकाम्या ठेवून परिस्थितीनुसार हायकमांडच्या सल्ल्याने दुसऱया टप्प्यात तेथे नेमणुका करण्यात येणार असल्याचे समजते.
निष्ठावंतांना अधिक प्राधान्य
पक्षातील निष्ठावंतांना प्रथम प्राधान्य देण्याचा विचार हायकमांडचा असल्याने आमदार एस. अंगार, सुनीलकुमार, अप्पच्चु रंजन, सतीश रेड्डी, अरग ज्ञानेंद्र, एस. ए. रामदास यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय असणारे एम. पी. रेणुकाचार्य, एम. पी. कुमारस्वामी, राजुगौडा नायक, हरताळु हालप्पा, कुमार बंगारप्पा, भालचंद्र जारकीहोळी यांची नावेही संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आहेत.
निजद-काँगेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या आणि येडियुराप्पांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविलेल्या डॉ. के. सुधाकर, के. गोपालय्या, भैरती बसवराजू, एस. टी. सोमशेखर, बी. सी. पाटील, मुनिरत्न यांन देखील मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. उर्वरितांना आणि येडियुराप्पा ज्येष्ठांना डावलण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
येडियुराप्पांच्या निवासस्थानी आमदारांची रांग
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई दिल्लीत असताना इकडे बेंगळूरमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱयांची येडियुराप्पा यांची भेट घेण्यासाठी रांग लागली आहे. सोमवारी सकाळपासूनच अनेक आमदार येडियुराप्पांच्या भेटीसाठी येत होते. एस. आर. विश्वनाथ, प्रितम गौडा, मसाले जयराम, एम. पी. कुमारस्वामी, विधानपरिषद सदस्य एम. टी. बी. नागराज आदी आमदारांनी येडियुराप्पा यांनी भेट घेतली. तिर्थहळ्ळीचे आमदार अरग ज्ञानेंद्र, हुनगुंदचे आमदार दोड्डनगौडा पाटील समर्थकांसमवेत येडिंच्या भेटीसाठी आले होते. विधानपरिषद सदस्य एन. रविकुमार, साबन्ना तळवार, लालाजी मेंडन यांच्यापैकी दोघांना मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे.