उपचाराधीन रुग्णसंख्येत आणखी घट, पण सावधनता आवश्यकच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बुधवारी सलग दुसऱया दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 20 हजाराच्या खाली राहिली आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या चोवीस तासांच्या काळात 18,870 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णसंख्येतही घट झाली असून ती 2,82,520 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
एकंदर बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.84 टक्के आहे. आतापर्यंतची एकंदर बाधित संख्या 3,37,16,451 इतकी असून मृत्यूंची संख्या 4,47,751 इतकी आहे. चाचण्यांच्या संख्येच्या तुलनेत नव्या रुग्णांचे प्रमाण 1.25 टक्के इतके आहे. मंगळवार ते बुधवार या काळात 15,04,713 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 56,74,50,185 चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्यांची आतापर्यंतची संख्या 3,29,86,180 इतकी असून मृत्यूंचे आतापर्यंतचे प्रमाण एकंदर रुग्णसंख्येच्या 1.33 टक्के आहे.
लसीकरण 90 कोटींकडे
आतापर्यंत एकंदर 87.66 कोटी देशवासियांना कोरोना लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ही संख्या 90 कोटीपार जाईल. प्रतिदिन किमान 60 लाख लोकांना लस दिली जात आहे.