1. गेल्या वषी घराबाहेर न पडल्यामुळे सगळे कपडे घट्ट झाले आहेत. नवे कपडे घेताना लहान मुलांसाठी जसे वाढत्या मापाचे कपडे घेतात तसे वाढत्या मापाचे नवे कपडे घेणार. कारण कोरोनाचा धाकटा भाऊ ब्रिटनहून येऊ घातला आहे. तो देखील काही दिवस घरात बसवील अशी भीती वाटते.
2. आचार्य अत्रे यांच्या ‘साष्टांग नमस्कार’मध्ये रावबहादूर आजारी असतात. त्यामुळे साष्टांग नमस्कार घालणे शक्मय नसते. तस्मात ते मनातल्या मनात साष्टांग नमस्कार घालतात. यंदा अस्मादिकदेखील बागेतले सारे व्यायाम प्रकार मनातल्या मनात करणार.
3. टीव्हीवाल्यांनी, व्हॉट्सअपवीरांनी किंवा कोणीही शिफारस केलेला कोणताही काढा, औषध विकत किंवा फुकटही घेणार नाही.
4. यंदा आपल्या देशात ब्रिटीश पाहुणे येणार आहेत असे म्हणतात. त्यांच्या बरोबर नव्या कोरोनाचा ताज्या दमाचा व्हायरस येऊ नये म्हणून देवाची प्रार्थना करीन. मनातल्या मनात ‘सायमन गो, बॅक’च्या चालीवर ‘फिरंगी पाहुणा, गो बॅक’, ‘नवा विषाणू, गो बॅक’ अशा घोषणा देत राहीन.
5.व्हॉट्सअपवर आलेले कोरोना, मास्क वगैरेवरचे शिळे विनोद वाचणार नाही, वाचले तरी हसणार नाही, कोणालाही ते फॉरवर्ड करणार नाही.
6. कोणत्याही मंत्र्यांनी अमुक स्त्रीने केलेले कोरोनानाशक पापड खायला किंवा कोरोनानाशक चारोळी म्हणायला सांगितले तर त्यावर विश्वास ठेवणार नाही.
7 हनुवटीवर मास्क लावून फिरणाऱया लोकांना पाहून उगाच स्वतःची चिडचिड करून घेणार नाही. त्याऐवजी मनातल्या मनात त्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहीन.
8. दिवसभर घरात बसून कंटाळा आला की लोक टीव्ही बघतात. त्यावरच्या खोटय़ा बातम्या किंवा बालीश कौटुंबिक मालिका बघून रक्तदाब वाढू शकतो. असे कार्यक्रम मी स्पीकर म्युट करून पाहीन.
9. मास्क लावल्यामुळे अनेकदा समोरची व्यक्ती पटकन ओळखू येत नाही. तिने स्मितहास्य केले आणि आपण प्रतिसाद दिला नाही तर ती रागावते. यासाठी मास्कवर कशिदा काढून स्वतःचे नाव लिहावे अशी ओळखीच्या व्यक्तींना विनंती करीन.
10. कोरोनाचे थैमान चालू असताना सार्वजनिक ठिकाणी विविध सण साजरे करावेत, गर्दी करावी म्हणून कोणत्याही जातीधर्मातील लोकांना चिथावणी देणाऱया कोणत्याही पुढाऱयांना इथून पुढच्या कोणत्याही निवडणुकीत मत देणार नाही.