जानेवारीत प्रीबुकिंग सुरू : जूनपर्यंत भारतात दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील दिग्गज इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला आपली नवी कार भारतात पुढील वषी दाखल करण्याची तयारी करते आहे. भारतीयांना ही कार जून 2021 पर्यंत मिळू शकणार असून या कारसाठी पुढच्या जानेवारीमध्ये प्रीबुकिंगला सुरुवात होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीची नवीन सेडान मॉडेल 3 ही इलेक्ट्रीक कार पहिल्यांदाच भारतामध्ये प्रवेश करणार आहे. कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी दीर्घकाळापासून आपली इलेक्ट्रीक कार भारतात दाखल करण्याची योजना आखली होती. ती नव्या वर्षात मूर्तरूपात येणार आहे. या नव्या कारची किंमत 55 ते 60 लाखाच्या घरात असेल असेही सांगितले जात आहे. या गाडीच्या बुकिंगकरता ग्राहकांना 73 हजार रुपये भरावे लागणार आहेत. मॉडेल 3 ही टेस्लाची आत्तापर्यंतची सर्वात परवडणारी कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतातच तयार होणारी ही कार लवकरच विक्रीकरता उपलब्ध होणार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर गाडी 500 किलोमीटरचे अंतर कापू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
भारतात संशोधन व विकास केंद्र
येणाऱया काळात कंपनी भारतात संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे समजते. सदरचे केंद्र बेंगळुरमध्ये सुरू होऊ शकते, अशीही माहिती पुढे आली आहे.