कंत्राट संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पहावी लागणार वाट
प्रतिनिधी /बेळगाव
नव्या वीज ग्राहकांना विद्युत मीटरची टंचाई भासत आहे. एल ऍण्ड टी कंपनीचे कंत्राट संपले असून नवीन कंत्राटासाठी निविदा मागविल्यानंतरच विद्युत मीटरचा पुरवठा सुरळीत पद्धतीने होणार आहे. परंतु निविदा मागविण्याच्या प्रक्रियेला विधानपरिषद निवडणुकीमुळे खो बसला आहे. त्यामुळे अजून दीड महिना तरी विद्युत मीटरसाठी ग्राहकांना हेलपाटे मारावे लागणार आहेत.
यापूर्वी एल ऍण्ड टी कंपनी विद्युत मीटरचा पुरवठा करीत होती. रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात कंपनीचे आऊटलूक होते. तेथून ग्राहकांना विद्युत मीटर पुरवठा केले जात होते. एलटी 2, एलटी 3 यासह इतर मीटर ग्राहकांच्या मागणीनुसार पुरविले जात होते. या कंपनीचे कंत्राट मागील महिन्यात संपले. त्यामुळे कंपनीने शिल्लक असलेले मीटर देण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव शहर परिसरात दररोज 100 ते 150 मीटरची आवश्यकता असते. मागणीच्या मानाने मीटरची उपलब्धता होत नसल्याचे दिसून येत आहे.
नवीन कामांना लागला ब्रेक
घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर टेंपररी मीटरच्या ठिकाणी कायमस्वरुपी मीटर बसविला जातो. बांधकाम पूर्ण झाले असले तरी मीटर उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी वास्तुशांतीचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत. जोवर मीटरच उपलब्ध होणार नाही तोवर घराचा ताबा कसा घेणार, असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. विद्युत मीटर मिळविण्यासाठी ग्राहकांना हेस्कॉम कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करताना तांत्रिक अडचणी
विद्युत मीटर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना समस्या जाणवत आहेत. यावर तोडगा म्हणून हेस्कॉमकडून काही प्रमाणात विद्युत मीटर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्यादृष्टीने जोवर निविदा काढल्या जात नाहीत तोवर हेस्कॉमकडून मीटर पुरवठा करण्यात यावा, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– आर. एम. कुंटे (अध्यक्ष इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टर असोसिएशन)