बॅटरी व साहित्य निर्मिती करणार – 2025 पर्यंत करणार गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी एलजी नव्याने 8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असून याअंतर्गत कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी व इकोप्रेंडली साहित्याच्या निर्मितीवर भर देणार असल्याचे समजते. कंपनीचे सीईओ हॅक चीओल शीन यांनी पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली आहे.
दक्षिण कोरियाची असणारी ही कंपनी नव्या व्यवसायात संधी आजमावणार असल्याचे समजते. सदरची वरील गुंतवणूक ही 2025 पर्यंतच्या काळात टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एलजी केम ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी साहित्याची निर्मिती करणार आहे. जागतिक स्तरावरच्या व्यवसायातील स्पर्धेत उतरण्याचा मानस कंपनीचा आहे. एलजी केम याकरीता अंदाजे 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. 60 हजार टन इतक्या अनोड साहित्याच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरीयात डिसेंबरमध्ये कारखान्याच्या कार्याला प्रारंभ करणार असल्याचे समजते. 2026 पर्यंत अनोडचे उत्पादन कंपनीला 2 लाख 60 हजार टनवर पोहचवायचे आहे.