नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजधानीमध्ये नव्याने साकारल्या जाणाऱया नव्या संसद भवनाची पायाभरणी व भूमिपूजन सोहळा येत्या गुरुवारी म्हणजे 10 डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिली. मागील आठवडय़ातच त्यांनी नव्या इमारतीच्या जागेची पाहणी करत सर्व कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर नुकतीच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेत भूमिपूजन सोहळय़ाच्या मुहूर्तावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
संसदेचे नवे भवन निर्माण करण्याचे कंत्राट टाटा समुहाला मिळाले आहे. या प्रकल्पावर 865 कोटी रुपये खर्च होणार आहेत. नवी संसद पार्लमेंट हाऊस स्टेटच्या प्लॉट क्रमांक 118 वर निर्माण केली जाणार आहे. प्रकल्पाच्या अंतर्गत इंडिया गेटच्या आसपास आणखीन 10 इमारती निर्माण करण्यात येणार असून त्यात 51 मंत्रालयांची कार्यालये असणार आहेत. सुमारे 100 वर्षांनंतर संसद भवन नव्याने उभारले जाणार आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प डिझाईन करणारे अहमदाबादचे स्थापत्यकार विमल पटेल यांनी नव्या संसद भवनाचे डिझाईन तयार केले आहे. तसेच याला ‘सेंट्रल विस्टा प्रकल्प नाव देण्यात आले आहे.