बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे परीक्षेचे नियोजन : पहिल्यांदाच ओएमआर उत्तरपत्रिकेचा होणार वापर
प्रतिनिधी /बेळगाव
दहावी परीक्षेच्या स्वरूपात यावषी बदल करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बहुपर्यायी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रथमच ओएमआर उत्तरपत्रिकेचा वापर करण्यात येणार असल्याने शाळांकडून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना नमुना ओएमआर उत्तरपत्रिका दाखविली असून ती भरण्याविषयी माहिती दिली आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु दहावीची परीक्षा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. इतर राज्यांनी खबरदारी म्हणून दहावीची परीक्षा रद्द केली. परंतु कर्नाटक राज्य सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 19 व 22 जुलै रोजी राज्यभरात परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोयीचे व्हावे, यासाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. दोन दिवस परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये सर्व विषयांचा समावेश असणार आहे.
विद्यार्थ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे
विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. प्रश्नांच्या खाली देण्यात आलेल्या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. उत्तरपत्रिकेतील प्रश्न क्रमांकासमोर असलेला योग्य पर्याय पेनाने भरायचा आहे. यावषी उत्तरपत्रिका संगणकाच्या साहाय्याने तपासल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी गोळे पूर्ण भरणे आवश्यक आहे. अर्धवट भरलेले गोळे ग्राहय़ धरले जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
एकूण 5 हजार 995 कर्मचाऱयांची नेमणूक
दहावीच्या परीक्षेला बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 35 हजार 308 विद्यार्थी बसणार आहेत. यातील 19 हजार 134 विद्यार्थी व 16 हजार 174 विद्यार्थिनी आहेत. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर कर्मचारी मिळून 5 हजार 995 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने 600 लिटर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 45 हजार मास्क शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहेत.