प्रांताधिकाऱयांच्या पोलीस निरीक्षकांना सूचना अनधिकृत स्टॉल, अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही होणार
प्रतिनिधी / कणकवली:
नांदगाव तिठा येथील रिक्षा स्टँड अधिकृत असताना तेथील इमारतमालक रिक्षा व्यावसायिकांना त्रास देत आहे. याचठिकाणी अनधिकृत स्टॉल, बांधकामे करण्यात आली आहेत. असे अनधिकृत स्टॉल व सार्वजनिक बांधकामच्या जागेतील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. तसेच रिक्षा व्यावसायिकांना स्टँडसाठीच्या जागेत रिक्षा उभ्या करण्यास द्याव्यात, अशी मागणी रिक्षा संघटनेतर्फे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने संयुक्तपणे अशी अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देतानाच पोलीस निरीक्षकांनी पाहणी करून रिक्षा स्टँडच्या वादाबाबत कार्यवाहीच्या सूचना प्रांताधिकाऱयांनी दिल्या.
सन्मित्र रिक्षा संघटना, नांदगावने आपल्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी वैशाली राजमाने व पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा रिक्षा युनियनचे कार्याध्यक्ष अण्णा कोदे, भाजप तालुका अध्यक्ष राजन चिके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, आयनल सरपंच बापू फाटक, नांदगाव उपसरपंच निरज मोर्ये, कोळोशी सरपंच ऋतिका सावंत, माईन सरपंच सुखटणकर, सन्मित्र रिक्षा संघटना पंचक्रोशी अध्यक्ष विलास कांडर, महमूद काझी, दिलीप डामरे, इक्बाल बटवाले, जाफर कुंकेरकर, देव डामरे, सुरेश मुरकर, भाई मोरजकर, संतोष पोकळे, अंकुश तेली, पंढरी म्हसकर, आप्पा गुरव, पांडू म्हसकर, संतोष तांबे, ज्ञानेश्वर मोरे, रहमान पाटणकर, तय्यब नावलेकर, आप्पा गावकर, सुनील बोभाटे, मंदार गुरव आदी उपस्थित होते.
सन्मित्र रिक्षा संघटना ही 1985 पासून कार्यरत असून आरटीओ जवळ नोंदणीकृत स्टँन्ड आहे. या ठिकाणी इमारत मालक व त्यांची मुले आमच्या रिक्षा चालकांना दमदाटी करून रिक्षा लावण्यास मज्जाव करत आहेत. त्याठिकाणी अधिकृत रिक्षा स्टँन्डवर पुन्हा रिक्षा लावण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश देऊन आमची गैरसोय दूर करावी. तसेच नांदगाव तिठा येथे निपाणी-देवगड या राज्य महामार्गावर अनधिकृत बांधकामे, स्टॉल उभारण्यात आले आहेत. ते हटविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
चर्चेवेळी प्रांताधिकाऱयांनी सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता बातुसकर यांना बोलावून घेत चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांशी चर्चा करत दोन्ही विभागाच्या जागेत झालेल्या अतिक्रमण व स्टॉलबाबत पाहणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. स्टँड अधिकृत असताना जर आडकाठी होत असेल, तर पोलिसांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत पाहणी करून कार्यवाहीच्या सूचनाही श्रीमती राजमाने यांनी केल्या.
त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेतल्यानंतर स्वत: जागेवर येऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पुढील काळात प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.