वृत्तसंस्था/ मुंबई
नांदेडमध्ये क्रिकेट अकादमीची स्थापना करण्यासाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे काँग्रेस नेते तसेच विद्यमान पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी धवल कुलकर्णीने चर्चा केली.
नांदेडमध्ये पहिल्यांदा क्रिकेट अकादमीची स्थापना करण्याची इच्छा रोहित शर्माने व्यक्त केली होती. धवल कुलकर्णीने क्रिकेट अकादमी स्थापना प्रस्तावावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या अकादमीमुळे नांदेडमधील नवोदित क्रिकेटपटूंना अधिक लाभ मिळणार आहे. या अकादमीमध्ये युवा क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.