प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नाईट कर्फ्यूसंबंधी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी आदेश जारी केला आहे. बुधवारी रात्री 9 पासून हा आदेश अंमलात आला असून रोज रात्री 9 ते दुसऱया दिवशी सकाळी 6 पर्यंत संपूर्ण जिह्यात कर्फ्यू असणार आहे.
4 मे 2021 पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच शुक्रवारी रात्री 9 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत विकेंड कर्फ्यू असणार आहे. यासंदर्भातही जिल्हाधिकाऱयांनी आदेश जारी केला आहे. या काळात अनावश्यकपणे फिरण्यावर निर्बंध असणार आहे.
आवश्यक सेवा व तालुका आपत्ती निवारण समितीकडून पूर्व परवानगी घेऊन होणारे कार्यक्रम आदींना हा आदेश लागू नसणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर भारतीय दंडसंहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला असून पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख, सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांकडूनही आदेश
यासंबंधी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनीही आदेश जारी केला आहे. बुधवारी रात्री 9 पासून रोज रात्रीचा कर्फ्यू असणार आहे. नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, आदी सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत.