यजमान राष्ट्राच्या अव्वल सुपरस्टार टेनिसपटूचे आव्हान संपुष्टात
जपानची अव्वल सुपरस्टार, टेनिसतारका नाओमी ओसाकाला ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत तिसऱया फेरीतून बाहेर व्हावे लागले. तिला प्रेंच ओपनची माजी फायनलिस्ट मॅर्केता व्होन्ड्रोसोव्हाने 6-1, 6-4 अशा फरकाने मात दिली.
द्वितीय मानांकित ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला आणि ती अमेरिकेत लहानाची मोठी झाली. येथे मंगळवारी तिसऱया फेरीतील लढतीत तिला ग्राऊंडस्ट्रोक्सवर फारशी हुकूमत दाखवता आली नाही. दुसरीकडे, मॅर्केताने एकापेक्षा एक सरस ड्रॉप शॉटचा खुबीने वापर करत पूर्ण सामन्यावर एककलमी वर्चस्व गाजवले. मर्केताने ओसाकाला तिच्या कम्फर्ट झोनबाहेर खेळणे भाग पाडले आणि हेच तिच्या यशाचे रहस्य ठरले.
‘जपानमध्येच खेळणे आणि ते ही ऑलिम्पिकमध्ये तिच्यासाठी कठीण होते, असे मला जाणवले. इतके दडपण हाताळणे कल्पनेच्या पलीकडचे आहे’, असे 42 वी मानांकित मर्केता म्हणाली.
गत शुक्रवारी संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळय़ात ओसाकाने क्रीडाज्योत प्रज्वलित केली होती. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर तिने पहिले दोन्ही सामने सरळ सेट्समध्ये जिंकत जोरदार सुरुवातही केली. मात्र, पुढे हाच टेम्पो तिला कायम राखता आला नाही. हा सामना झाल्यानंतर ओसाका तातडीने स्टेडियम सोडून निघून गेली. ती प्रसारमाध्यमांशी बोलणार नसल्याचे यावेळी आयोजकांनी स्पष्ट केले.
ओसाकाने यापूर्वी प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रसारमाध्यमांशी बोलल्याने आपल्यावर दडपण येते, असे सांगत पत्रकार परिषद टाळली आणि याबद्दल तिच्यावर दंडात्मक कारवाई देखील झाली होती. त्यानंतर दुसऱयाच दिवशी तिने स्पर्धेतून माघार जाहीर केली. पुढे विम्बल्डनमध्येही खेळणार नसल्याचा निर्णय जाहीर केला. येथे ऑलिम्पिकमध्ये मात्र ती सहभागी झाली. अर्थात, तिसऱया फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले.
पुरुष गटात स्टेफानोस त्सित्सिपसची आगेकूच
या स्पर्धेतील पुरुष गटात ग्रीकच्या स्टेफानोस सित्सिपसने आपल्या घराण्याकडून चालत आलेली परंपरा कायम राखण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी वाटचाल कायम राखली. त्याने मंगळवारी अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोला 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये नमवत शेवटच्या 16 मध्ये आपले स्थान निश्चित केले. स्टेफानोसच्या आजोबांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते. आता हाच पराक्रम गाजवण्याचा त्याचा मानस आहे. त्याचे आजोबा सर्जेई सॅलिन्कोव्ह हे 1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱया सोव्हिएत युनियन संघाचे सदस्य राहिले.