फ्रान्समधील अँथोनी लोप्रेडो या इसमाला जग ब्लॅक एलियन असे संबोधिते. या 33 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पूर्ण शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. याचबरोबर त्याने स्वतःच्या डाव्या हातातील दोन बोटं कापून घेतली आहेत. स्वतःच्या हाताला एका विचित्र पंज्यासारखे दर्शविण्यासाठी त्याने हा प्रकार केला आहे.
अँथोनीने केवळ बोटंच नव्हे तर स्वतःचे नाक आणि वरच्या बाजूचा ओठही कापून घेतला आहे. याचबरोबर त्याने स्वतःच्या डोळय़ांमध्येही टॅटू काढून घेतला आहे.
2017 साली त्याने फ्रान्समधील वृत्तपत्र ‘मिडी लिबरे’ला एक मुलाखत दिली होती. मी लहानपणापासूनच स्वतःच्या शरीरासोबत ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा छंद बाळगून होतो. पूर्वी मी सुरक्षारक्षकाची नोकरी करायचो, त्यानंतर मी मनाप्रमाणे जगत नसल्याचे जाणवले. वयाच्या 24 व्या वर्षी मी सर्वकाही सोडून दिले होते असे त्याने म्हटले होते.
अँथोनीला त्याच्या या छंदाबद्दल एक दिवस नक्की वैषम्य वाटणार असल्याचे एका सोशल मीडिया युजरने नमूद केले आहे. तर अन्य युजरने अँथोनीची ही कृती विचलित करणारी तसेच आकर्षक असल्याचे म्हटले आहे.