बोरगावचे सपोनि डॉ.सागर वाघ यांची यशस्वी शिष्टाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मंडळांचा ‘ऐतिहासिक
निर्णय प्रतिनिधी/नागठाणे
सातारा तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या व महामार्गावरील बाजारपेठेचे मुख्य गाव असलेल्या नागठाणे( ता.सातारा) येथे ‘एक गाव…..एक गणपती’ चा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी उशिरा ग्रामपंचायत सदस्य,विविध मंडळांचे कार्यकर्ते यांच्याशी बोरगाव पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.सपोनि डॉ.सागर वाघ यांची भूमिका यावेळी महत्वाची ठरली असून बोरगाव पोलीस ठाण्याच्या कारकिर्दीतील सर्वात उल्लेखनीय घटना झाली आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यातच गणेशोत्सव ही जवळ आला आहे.नागठाणे गावातच अनेक गणेशोत्सव मंडळ असून येथे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात असतो.मात्र यावर्षी कोरोनाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावाने जिल्हा प्रशासनाबरोबरच येथील मंडळांमध्येही चिंतेचे वातावरण होते.
सोमवारी सायंकाळी उशिरा नागठाणे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या सभागृहात बोरगाव पोलीस ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक घातली.यावेळी सपोनि डॉ.सागर वाघ यांनी देशासह जिल्ह्यात कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण,गर्दीतून रोगाचा होणारा प्रसार व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके याची ग्रामस्थ व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना देत गावात वेगवेगळे गणेशोत्सव साजरा न करता ‘ एक गाव….एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे आवाहन केले.ग्रामपंचायतीनेही त्यांच्या या निर्णयाला दुजोरा दिला.यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला पाठींबा देत ‘एक गाव…..एक गणपती’ संकल्पना राबविण्यास पाठींबा देत प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी झालेल्या बैठकीत गावचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा तसेच गणेशोत्सव काळात प्रत्येक दिवशी ठरवून दिलेल्या मंडळांच्या पाच कार्यकर्त्यांनी श्री गणेशाची पूजा- अर्चा करावी असाही निर्णय घेण्यात आला.या बैठकीस सपोनि डॉ.सागर वाघ, सरपंच विष्णू साळुंखे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंखे, राजेंद्र साळुंखे, शंकर सुतार, आमीन शिकलगार, पोलीस पाटील रमेश साळुंखे, गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.