प्रतिनिधी / नागठाणे
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात पोहचला आहे. या साथरोगाचा वाढता प्रसार पाहता ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांच्या सोयीसाठी नागठाणे (ता.सातारा) येथे सुसज्ज असे करोना सेंटर सुरू करण्यात आले आहे.नागठाणे- सासपडे रस्त्यानजीक कोहिनूर मल्टिपर्पज हॉल येथे हे कोव्हिडं सेंटर सुरू करण्यात आले आहे.या कोरोना केअर सेंटरचे उदघाटन गुरुवारी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते,सरपंच विष्णू साळुंखे,मंडल अधिकारी नारायण जावलीकर, डॉ सुधाकर बेंद्रे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.कांबळे,अजित साळुंखे ,सोसायटी चेअरमन संजय साळुंखे,ग्रामपंचायत सदस्य आमीन शिकलगार,अब्दुल सुतार (पिंटूशेठ) आदी मान्यवर उपस्थित होते.
या कोव्हिडं सेंटरमध्ये रुग्णांसाठी २८ ऑक्सिजन बेड,७ आयसोलेशन बेड,२४ तास प्रशिक्षित डॉक्टर्स,सर्व प्रकारची औषधे,रुग्णांच्या गरजेनुसार इंजेक्शन, अनुभवी नर्स,वार्डबॉय
सिक्युरिटी गार्डस इत्यादी उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रुग्णांची एम.डी. मेडिसिन डॉक्टरांकडून रोज तपासणी केली जाणार आहे.
नागठाणे येथील कोरोना केअर सेंटर मधील सर्व इलाज हे शासकीय नियमांच्या अधीन राहून प्रत्येक पेशंटकडून माफक खर्च घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती कोहिनुर मल्टिपरपज हॉलचे मालक रियाज शिकलगार यांनी यावेळी सांगितले.नागठाणे सारख्या ग्रामीण भागात हे कोरोना सेंटर चालू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.