ऑनलाईन टीम / नागपूर :
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
नितीन राऊत यांनी यावेळी शहरातील परिस्थितीची माहिती दिली. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरता येणार नाही असेही सांगितले.
लॉकडाऊनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालये बंद राहणार असून शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असे नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री दुकान बंद राहतील, मात्र त्यांची ऑनलाईन विक्री सुरु राहणार आहे. तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. ओळखपत्र बाळगणे आवश्यक असेल असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, लसीकरण सुरु ठेवले जाणार असून 131 केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकाने सुरु राहतील. डोळ्यांचे दवाखानेही सुरु असतील. तसेच घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल, असा इशारा नितीन राऊत यांनी यावेळी दिला आहे. शहरात कोणीही विनाकारण फिरु नये सांगताना नितीन राऊत यांनी बंदी असल्याची माहिती दिली आहे.