बेळगाव विमानतळ संचालकांची स्टार एअरच्या सीईओंकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधून नागपूर, जयपूर या शहरांना विमानसेवा सुरू करण्याची मागणी वाढली आहे. यामुळेच बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्टार एअरच्या सीईओ सिमरन सिंग तिवाना यांच्याकडे बेळगावमधून नागपूर, जयपूर व बेंगळूर या शहरांना विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गांवर विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
देशातील एक प्रमुख शहर असणाऱया जयपूर या ठिकाणी प्रवास करणाऱयांची संख्या अधिक आहे. पर्यटन, व्यापार, उद्योग यासाठी प्रवास केला जातो. राजस्थान येथील अनेक नागरिक व्यवसायानिमित्त बेळगावमध्ये स्थायिक आहेत. त्यांची नियमित ये-जा असते. त्यामुळे बेळगावमधून जयपूर शहराला विमानसेवा सुरू केल्यास सोयीचे ठरणार आहे. याचसोबत महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱया नागपूर शहराला स्टार एअर विमानफेरी सुरू करणार होते. परंतु कोरोनामुळे ही विमानफेरी रखडली. ही विमानफेरी पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
बेळगाव-बेंगळूर विमानफेरी पूर्ववत करा
स्टार एअरने यापूर्वी बेळगाव-बेंगळूर मार्गावर विमानफेरी सुरू केली होती. परंतु कोरोनाच्या काळात ही विमानफेरी बंद झाली. सध्या इंडिगो ही एकमेव कंपनी बेंगळूर मार्गावर सेवा देत आहे. त्यामुळे स्टार एअरने ही विमानफेरी पूर्ववत केल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गांवर विमानफेरी सुरू करण्याची मागणी राजेशकुमार मौर्य यांनी सिमरन सिंग तिवाना यांच्याकडे केली आहे.