क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
अलगुर, जमखंडी येथे सुरू असलेल्या कर्नाटक केसरी राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या जीवाप्पा कळेमनी, भांदुरगल्ली तालमीचा मल्ल नागराज बशीडोणीने एमईजी सेंटर बेंगळूरच्या पांडुरंग शिंदेचा 6-2 अशा गुणांनी पराभव करीत कर्नाटक केसरी या मानाच्या किताबासह चांदीची गदा पटकावली.
जमखंडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्नाटक राज्यातील 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. कर्नाटक केसरी खुल्या गटात नागराज बशीडोणीने पहिल्या फेरीत विजापूरच्या सागर उलडदीचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत नागराजने बेंगळूरच्या सुधाकरवर 11-3 अशा गुण फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याची उपांत्य फेरीची लढत रत्नकुमार मठपती आखाडय़ाच्या संगमेश बिराजदार या तुल्यबळ मल्लाशी झाला. पहिल्या फेरीत दोन्ही मल्लानी 1-1 अशी बरोबरी केली होती. पण दुसऱया फेरीत नागराजने 2 गुणांसह संगमेशवर निर्विवाद विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीत नागराज बशीडोणीची लढत बेंगळूरच्या एमईजी सेंटरच्या पांडुरंग शिंदे याच्याशी झाली. या लढतीत पहिल्या फेरीत 2-1 अशी नागराजने बढत मिळविली. दुसऱया फेरीतही आक्रमक खेळ करून नागराजने पुन्हा चार गुण मिळवले आणि 6-2 अशा गुणांनी विजय मिळवित कर्नाटक केसरीचा बहुमान पटकावला. त्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्नाटक केसरी किताब, 2 किलो वजनाची चांदीची गदा व रोख 20 हजार रूपये देऊन गौरविण्यात आले. नागराज बशीडोणी याला राष्ट्रीय पदक विजेता मारूती घाडी व महावीर जखनूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याच तालमीतील 38 किलो वजनी गटातील ओम घाडी व 42 किलो वजन गटातील श्री घाडी या दोघांनी रौप्य पदक पटकाविले.