प्रतिनिधी /पणजी :
पणजी गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद आमोणकर व इतर पदाधिकाऱयांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्या सर्वांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांना फुले व भाजपचे कमळ असलेली शाल देवून त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे पणजीतील स्थान आणखीन बळकट झाल्याचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.
पणजीत काल सकाळच्या सत्रात आमोणकर व इतर पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेवून काँग्रेस पक्षातून राजीनामा देत असल्याचे सांगून पणजीचे आमदार मोन्सेरात यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. नागरीकत्त्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी (एनसीआर) या प्रकरणी काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करुन भडकवत आहे. तसेच जनतेमध्ये दुफळी निर्माण करुन खोटय़ा अफवा पसरवत आहे. हा प्रकार मान्य नसल्यामुळे आम्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी निवेदन केले.
खरे म्हणजे काँग्रेसने सीएए आणि एनसीआर यांना पाठिंबा देऊन त्यांचे स्वागत करायला हवे होते परंतु काँग्रेस पक्ष नेमके उलटे करीत असल्याने ते आम्हाला पटे नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत असल्याचा खुलासा त्यांनी केला.
सीएए आणि एनआरसी या दोन्ही गोष्टी जनतेच्या हितासाठीच आहेत. परंतु काँग्रेस पक्षाने त्याचे स्वार्थी राजकारण चालवले आहे. विनाकारण विरोध करण्याची काँग्रेसला सवय झाली आहे. चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्याऐवजी काँग्रेस पक्ष त्यास विरोध करतो व जनतेमध्ये संभ्रम पसरवतो जनतेची दिशाभूल करतो असे अनेक आरोप आमोणकर यांनी काँग्रेस नेत्यांवर केले. तसेच भाजपमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी तेथेच सांगून टाकले.
त्यानंतर सायंकाळी पणजीत झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत त्या सर्वांना भाजपमध्ये रितसर प्रवेश देण्यात आला. त्यावेळी आमदार बाबूश मोन्सेरात व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे उपस्थित होते. त्यावेळी कुंकळ्येकर म्हणाले की सीएए व एनआरसी प्रकरणी काँग्रेस पक्ष लोकांना भडकावून दुफळीचे राजकारण खेळत आहे त्याचा कोणताही त्रास किंवा परिणाम जनतेला होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्मार्ट सिटीची कामे चालू असून पणजी शहराचा विकास करण्याच्या हेतूने सर्व प्रयत्न सुरु आहेत. पणजी शहरात रु. 180 कोटी खर्च करुन सीसीटिव्ही कॅमेरे बसवायचे की नाहीत यावर विचार चालू असून तो निधी विकासासाठी वापरता येऊ शकतो असे मोन्सेरात म्हणाले.