ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र पोलीसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
पिंपरी-चिंचवड येथील रामकष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ-365’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले.
पवार म्हणाले, राज्याच्या पोलिस दलाला शौर्याची, त्यागाची मोठी परंपरा आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले, त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेऊन प्रत्येक पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. ‘कोरोना’ काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन जोखीम पत्करुन चांगल्याप्रकारे सेवा केली आहे. या काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चित घेतली जाईल.
कोरोना काळात जोखीम पत्करुन पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करुन आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त राहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.