अमेरिका, ब्रिटन, चीन देखील अत्यंत पिछाडीवर
युक्रेनमधून स्वतःच्या नागरिकांना बाहेर काढण्याप्रकरणी भारताने अमेरिका, ब्रिटन आणि चीन यासारख्या महासत्तांना मागे टाकले आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱयांनी यासंबंधी दावा केला आहे. ऑपरेशन गंगा सुरू असून दूतावास देखील काम करत आहे. तर अन्य देश इतक्या व्यापक स्तरावर काम करू शकत नसल्याचे चित्र आहे. काही देशांनी तर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या स्वतःच्या नागरिकांसमोर हात वर केल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे.
तिरंगा पाहून वाट देतात युक्रेनियन
विरोधी पक्षांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी विविध देशांच्या प्रतिक्रिया अधिकाऱयांकडून निदर्शनास आणून देण्यात आल्या. चीनने स्वतःच्या नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम स्थगित केली तर भारतीय ऑपरेशन गंगा सुरू आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी देशातून विमानोड्डाणे होत आहेत. चीनने कुठलाच प्रवास निर्देश किंवा मदतव्यवस्था उपलब्ध केली नाही. तर भारताने संपर्क क्रमांका, सल्ला आणि मदतीसाठी पूर्ण व्यवस्था उभी केली आहे. युक्रेनमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. तर भारतीय ध्वज असलेल्या बसेसना सुरक्षित मार्ग दिला जातोय.
अमेरिकेने केले हात वर
स्वतःच्या नागरिकांना बाहेर काढण्यास सक्षम नसल्याचे अमेरिकेकडून म्हटले गेले आहे. अमेरिकेने स्वतःच्या नागरिकांना युक्रेनच्या सीमेवर दोन दिवसांसाठी भोजन आणि अन्य सामग्री नेण्यास सांगितले. भारत आणि अमेरिका दोघांनीही एकसारख्या सूचना करत सहाय्यासाठी अनेक फोन क्रमांक जारी केल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
जर्मन दूतावास बंद
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या स्वतःच्या नागरिकांना अधिक मदत प्रदान करू शकणार नसल्याचे ब्रिटनने स्पष्ट केले आहे. तर भारताने युद्ध पातळीवर सहकार्य वाढविले आहे. ब्रिटिश दूतावास स्थलांतति झाला तर कीव्हमध्ये भारतीय दूतावास अद्याप कार्यरत आहे. ब्रिटनने स्वतःच्या नागरिकांना कुठलीही अतिरिक्त मदत न करता युक्रेनच्या अधिकऱयांच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. अशाचप्रकारे कीव्हमधील जर्मन दूतावासही बंद करण्यात आला आहे. स्वतःच्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या स्थितीत नसल्याचे जर्मनीने स्पष्ट केले आहे.
युक्रेनमध्ये 80 हजारांहून अधिक विदेशी विद्यार्थी
युक्रेनच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 80 हजारांहून अधिक विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील सर्वात मोठी संख्या भारतीयांची असून त्यानंतर मोरक्को, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि नायजेरियाच्या विद्यार्थ्यांची आहे.