नगरसेवकाने घेतले नमते : रामदेव गल्ली भंगीबोळातील स्वच्छतागृह बांधण्याचे आमदारांचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
रामदेव गल्ली येथील भंगीबोळातील स्वच्छतागृह नगरसेवकाने आजूबाजूच्या नागरिक व व्यापाऱयांची परवानगी न घेताच सोमवारी हटविले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना बोलावून त्यांच्या समोरच नगरसेवकाला धारेवर धरले. व्यापाऱयांची बाजू ऐकून घेऊन आमदारांनी नवीन शौचालय बांधून देऊ, असे सांगितले. नागरिकांनी रोष व्यक्त करताच महानगरपालिकेलाही जाग आली आहे.
1970 पूर्वीपासून या ठिकाणी स्वच्छतागृह आहे. बाजारात येणाऱया नागरिकांना या स्वच्छतागृहाचा उपयोग होतो. केवळ नागरिकच नाही तर व्यापारी व कामगारांनाही या स्वच्छतागृहाचा उपयोग होतो. रामदेव गल्ली, बापट गल्ली या परिसरातील नागरिकांना हे स्वच्छतागृह सोयीचे ठरते. परंतु सोमवारी स्थानिक नगरसेवकाने कोणाचीही परवानगी न घेता जेसीबीने मुतारी हटविली. दुर्गंधी येत असल्याचे कारण देत मुतारी हटविण्यात आली. जर दुर्गंधी येत असेल तर स्वच्छता करणे सोडून मुतारी पाडविण्यात आल्याने व्यापाऱयांनी नाराजी व्यक्त केली.
संतप्त झालेल्या व्यापाऱयांनी मंगळवारी आमदार अनिल बेनके यांना या ठिकाणी बोलावून घेतले. यावेळी व्यापाऱयांनी नगरसेवकाला चांगलेच धारेवर धरले. 30 ते 40 वर्षांपासून असणारे स्वच्छतागृह पाडविण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला. स्वच्छतागृह पुन्हा न उभारल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच नगरसेवकाने स्वच्छतागृह पाडविल्याबद्दल माफी मागितली.
आमदार अनिल बेनके यांनी या ठिकाणी चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. आठवडाभरात या स्वच्छतागृहाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. यामुळे या वादावर पडदा पडला. यावेळी व्यापारी सुनील मुरकुटे, महादेव केसरकर, अंकुश केसरकर, भाऊ किल्लेकर, शुभम मोरे, शैलेश केवाडिया यांच्यासह नागरिक व व्यापारी उपस्थित होते.