कुपवाड / प्रतिनिधी
नागाला पकडून त्याच्यासोबत खेळाचे वेगवेगळे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी मौजे बावची (ता. वाळवा) येथील एका तरुणा विरोधात सांगलीच्या वन विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रदीप अशोक अडसुळे (वय २२) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयित प्रदीपने नागाला पकडून त्याच्यासोबत खेळ करून विविध व्हीडीओ तयार केले आणि सोशल मीडियावर प्रसारित केले. याबाबतची माहिती मिळताच त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई सांगली वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने व सहाय्यक वनसंरक्षक डॉ.अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव (शिराळा), वनपाल सुरेश चरापले (इस्लामपूर), वनरक्षक अमोल साठे (बावची) यांसह निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली.